राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस शंकरसिंह वाघेला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर त्यांनी पार्टीच्या सक्रीय सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

वाघेला हे गुजरातमध्ये एनसीपीच्या अध्यक्ष पदावर जयंत पटेल उर्फ बोस्की यांची नियुक्ती झाल्यापासून पक्ष नेतृत्वावर नाराज दिसत होते. त्यांनी या नाराजीतूनच राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून वाघेला यांनी राजीनामा दिला आहे. शिवाय, हे पत्र त्यांनी ट्विटरवर देखील पोस्ट केले आहे.

शंकरसिंह वाघेला यांनी जनसंघाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. नंतरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्येष्ठ नेते असलेल्या वाघेलांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत १९९६ साली स्वत:चा राष्ट्रीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन केला. १९९६ ते १९९७ गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या वाघेलांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.