देशात सत्ताबदल होणे आवश्यक आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. कोलकाता येथील महारॅलीत ते बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या महारॅलीत बावीस पक्ष सहभागी झाले आहेत. आम्ही एकत्र आलो आहोत आज तुम्हाला या मंचावरून वचन देतो की देशात जे मोदी सरकार आहे त्याचं परिवर्तन करणार असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने देशाच्या प्रमुख संस्थांवर आणि लोकशाहीवर हल्ला चढवला आहे. मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेऊन संपूर्ण देशातील सामान्य जनतेला त्रास दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं आहे. छोटे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचमुळे या मोदी सरकारला हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

या महारॅलीतील मंचावरून ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर कडाडून टीका केली. माझी पंतप्रधान होण्याची इच्छा नाही मात्र भाजपाची सत्ता देशातून गेली पाहिजे. राजकारणात एक लक्ष्मणरेष असते ती तुम्ही कधीही ओलांडता कामा नये मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांनाच टार्गेट केलं आहे. मग आम्ही त्यांच्यावर टीका का करायची नाही? असाही प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. ममता बॅनर्जी यांनी ऑगस्ट महिन्यापासून या महारॅलीची तयारी केली होती. या महारॅलीत बावीस पक्षांचा सहभाग होता. त्या सगळ्याच पक्षाच्या प्रतिनिधींनी मोदींवर टीका केली. आता या सगळ्याचा परिणाम निवडणुकांमध्ये कसा होतो ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.