राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यावर शरद पवार लगेचच मुंबईकडे रवाना झाले. डॉक्टरांनी शरद पवार यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मला एका जागी बसण्याची सवय नाही. पुढील दोन महिने मला एकही दिवस सुटी घेता येणार नाही. त्यामुळे आता बघू कशी विश्रांती घेता येईल, असे शरद पवार यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून बाहेर पडल्यावर पत्रकारांना सांगितले.
अस्वस्थ वाटू लागल्याने शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. मूत्रिपडाच्या कार्यात सौम्य बिघाड झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र त्यांचा रक्तदाब स्थिर होता. त्यांना दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.