महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली. दरम्यान, शरद पवार हे आता केंद्रात विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. रिपब्लिक टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार लवकरच ते यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या प्रकरणी सुरूवातीच्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाल्या असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती. तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्र पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती. परंतु राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं अध्यक्षपदही स्वीकारण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना सांगितलं.

“राहुल गांधी हे यूपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती यूपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल. ते सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत,” असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये युती केली होती. परंतु निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केलं होतं.

देशात सध्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. विरोधकांच्या एका शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी राहुल गांधीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अशावेळीही त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं होतं. २००४ पासून सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.