राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते आहे. या भेटीमध्ये मराठा मोर्चांबद्दल चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या भेटीची आणि त्यात झालेल्या चर्चेची मोठी चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. मात्र शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र राज्यातील मराठा मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यातील एकंदर वातावरण पाहता मोदी आणि पवारांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.

राज्यात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्च्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतल्याचे समजते आहे. राज्यभर लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर आता मराठा समाजाकडून दिल्लीतील मोर्च्याचे आयोजन केले जाते आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे जोरदार चर्चा आहे. मराठा समाजाचे मोर्चे, या समाजातील असंतोष आणि त्याचे निवडणुकीतील परिणाम या सगळ्याचा विचार करुन ही भेट झाल्याचे समजते आहे.