सरकारी यंत्रणेच्या दुरुपयोगाचा विरोधकांचा आरोप
तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर केलेल्या यज्ञाला उपस्थिती लावली. तेलंगण व आंध्र प्रदेशचे राज्यपाल इ. एस. एल. नरसिंहन व त्यांच्या पत्नी विमला नरसिंहन व काँग्रेस नेते टी. सुब्बारामी रेड्डी, काही शंकराचार्य एरावली या मेडक जिल्हय़ातील गावात सुरू असलेल्या या यज्ञास उपस्थित होते.
अयुथा चंडी महायज्ञम वैश्विक कल्याण व शांतीसाठी करण्यात येत असून, तो २३ डिसेंबरला सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव व आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष के. शिवप्रसाद राव यांनीही यज्ञास उपस्थिती लावली. तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र येथील २००० पुरोहित या वेळी उपस्थित होते. राव यांनी सांगितले, की या यज्ञावर सरकारी पैसा खर्च केलेला नाही, पण विरोधी काँग्रेस, भाजप व माकपने मात्र त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या यज्ञसमारंभासाठी उद्या उपस्थित राहणार आहेत, असे राव यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.