राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या अनुपस्थितीत बुधवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सर्वानुमते फेरनिवड झाली. या क्षणाचे औचित्य साधून पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. परदेशात जाऊन मोदी राजकारण खेळत असल्याचा आरोप पवारांनी या वेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची सहावी राष्ट्रीय परिषद येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पक्षाचे सरचिटणीस टी. पी. पीतांबर मास्टर यांनी पवारांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे जाहीर केले. अजित पवार या वेळी अनुपस्थित होते. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
परदेशात जाऊन मोदी राजकारण खेळत आहेत आणि ही गंभीर बाब आहे, कारण त्यामुळे देशाच्या प्रतिमेला तडा जात आहे. भगव्या विचारसरणीची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात भगवी विचारसरणी कशी रेटली जात आहे त्याबाबत अलीकडेच आपल्याला आयआयटीमधील काही तज्ज्ञांनी सांगितले, असेही पवार म्हणाले.
विकासाच्या नावाखाली भगव्या विचारसरणीच्या अंमलबजावणीचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्याला प्रतिकार करणे राष्ट्रवादीचे कर्तव्य आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व लोकशाहीवादी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.