देशातल्या पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. अंतिम विजय कोणाचा हे अवघ्या काही तासांमध्ये कळेलच. दरम्यान, आत्तापर्यंतच्या निकालासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आत्तापर्यंतच्या घटनाक्रमाबद्दलच्या आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल.

काही वेळापूर्वीच ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राम मतदारसंघातून विजय झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्याचं समोर आलं. यावेळी ट्विट करत त्या म्हणाल्या, भाजपाचा पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं. आम्ही निवडणूक आयोगाकडून खूप त्रास सहन केला.नंदीग्रामबद्दल चिंता करु नका, आम्ही एक लढा दिल्याने मला तिथे जास्त संघर्ष करावा लागला.

तेथील लोक जो कौल देतील तो मला मान्य आहे. आम्ही २२१ हून जास्त जागा जिंकल्या असून भाजपाचा पराभव झाला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.मात्र त्यानंतर नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाला आहे की पराभव यावरुन चर्चा सुरु असताना तृणमूलने अद्याप मतमोजणी सुरु असून कोणतेही अंदाज व्यक्त करु नका असं आवाहन केलं.