शरद पवार यांची भाजपवर टीका; रोजगार निर्मितीत सरकारला अपयश

काही संघटनांना हाताशी धरून सत्तारूढ भाजप देशातील वातावरण कलुषित करत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते देशातील राजकारण सध्या वाईट वळणावर गेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी केली. राष्ट्रवादीचा एकोणिसावा स्थापना दिवस समारंभात पवार एकीकडे भाजपला लक्ष्य करीत असताना दुसरीकडे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला धारेवर धरले. धर्मनिरपेक्षतेचा मक्ता फक्त एकटय़ा राष्ट्रवादीकडे नसल्याचे त्यांनी काँग्रेसला सुनावले.

पक्षाच्या एकोणिसाव्या स्थापना दिनानिमित्त येथील मावळणकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्या वेळी पवारांनी केलेले भाषण हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचा उद्रेक, मंदसौरचा गोळीबार, महाराष्ट्रातील संप आणि संघपरिवारातील संघटनांवर केंद्रित होते. शेतीमालाला उत्पादनाच्या खर्चापेक्षा पन्नास टक्के अधिक भाव देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. तीन वष्रे झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल करून ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा सध्या उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. पीकविम्यासाठी सुमारे सोळा हजार कोटींचा प्रीमियम भरला, पण शेतकऱ्यांना मिळालेली नुकसानभरपाई फक्त सात हजार कोटी रुपयांची आहे. म्हणजे विमा कंपन्यांचे घर सरकार भरत आहे. गव्हाचे उत्पादन भरघोस होणार असतानाही आयात शुल्क हटविले, तर डाळबांचे घसघशीत उत्पादन येणार असतानाही निर्यातबंदी वेळेवर उठविली नाही. तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी केलेल्या मोठय़ा आंदोलनाकडे मोदी सरकारने ढुंकूनही लक्ष दिले नाही.’

चार दिवसांपूर्वी सुमारे तासभर गुफ्तगू केलेल्या पंतप्रधान मोदींवरही पवारांनी कडाडून टीका केली. ‘मोदी परदेशात मोठमोठी भाषणे देतात, परदेशात भारताची मान उंचावल्याचा दावा करतात, पण त्याअगोदर संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल पहा. अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात मोदींना अपयश आल्याचा ठपका त्यात आहे. सक्तीने धर्मातर होत असल्याचे प्रतिपादन त्यात आहे. रोजगारनिर्मितीमध्ये तर सरकारला ठोस अपयश आले आहे. दोन वर्षांत फक्त तीन लाख रोजगार निर्माण झाले. याउलट डॉ. मनमोहन सिंग सरकारने एकटय़ा  २००९ मध्ये दहा लाख रोजगार निर्माण केले होते,’ असे ते म्हणाले.

दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणात काँग्रेसवर धारदार टीका होती. ‘काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे नाणे पुढे करते आणि मित्रांचा वापर सोयीपुरता करते. पण धर्मनिरपेक्षतेचा मक्ता फक्त एकटय़ा राष्ट्रवादीकडे नाही. उत्तर प्रदेश, गोव्यामध्ये आम्ही आघाडीसाठी तयार होतो. पण काँग्रेसने साधे विश्वासातदेखील घेतले नाही. अशा त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना गोवा व मणिपूरमध्ये जवळपास बहुमत असूनही सरकार बनवता आले नाही. म्हणून त्यांचे हे अनुभव पाहून आम्ही गुजरात आणि मेघालयात काँग्रेसची वाट पाहणार नाही,’ असे पटेल म्हणाले.

सीबीआयप्रकरणी हात झटकले

आपल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत एअर इंडियाने केलेल्या विमानखरेदीप्रकरणी व एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरणासंदर्भात सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्य़ाबद्दल त्यांनी हात झटकले. ते निर्णय माझे एकटय़ाचे नव्हते. पी. चिदम्बरम आणि प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने ते निर्णय घेतले होते. मी फक्त त्या निर्णयप्रक्रियेचा एक भाग होतो. त्यामुळे एअर इंडियाची जरूर चौकशी होऊ द्या. आपल्याला काही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.

स्वत:चा उमेदवार निवडून आणण्याइतके स्वच्छ संख्याबळ भाजपकडे असल्याने त्यांचा उमेदवार निवडून येण्याबाबत काही शंका नाही. त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असण्याचा प्रश्नच उदभवत नाही. भाजपला जरी गरज नसली तरी विरोधकांना विश्वासात घेतल्यास निवडणूक बिनविरोधही होऊ शकते.. – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी सरचिटणीस