News Flash

दुष्काळनिवारणात भेदभाव नको !

केंद्राकडून मिळणाऱ्या निधीच्या साह्य़ाने या राज्यांना दुष्काळाची कामे करता येणार आहेत.

| April 28, 2016 01:02 am

राज्यांना पुरेसा निधी देण्याची विरोधकांची मागणी
देशातील ३३ कोटी जनता दुष्काळछायेत होरपळत असताना केंद्रातील सरकार मात्र दुष्काळाशी दोन हात करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका करत राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधारी रालोआला धारेवर धरले.
महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये तीव्र दुष्काळ असून या राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत बिकट असल्याचे स्पष्ट करत विरोधकांनी राज्यसभेत बुधवारी केंद्राला घेरले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावर बोलताना केंद्राच्या धोरणावर टीका केली.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, तेलंगण, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. नागरिकांबरोबरच प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. या राज्यांना दुष्काळाशी तोंड देण्यासाठी केंद्राकडून खूप अपेक्षा आहेत. केंद्राकडून मिळणाऱ्या निधीच्या साह्य़ाने या राज्यांना दुष्काळाची कामे करता येणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने या राज्यांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला नसल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. या राज्यांमध्ये विविध पक्षांची सरकारे असून अशा संकटसमयी केंद्राने राजकारणाच्या पलीकडे जाऊन साह्य़ करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. मात्र, केंद्र सरकारकडून दुष्काळाबाबत कोणतेही खंबीर पाऊल उचलले जात नसल्याबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.
जलसिंचन प्रकल्प पूर्ण करा
दुष्काळी राज्यांमध्ये एकूण ३१२ जलसिंचनाचे प्रकल्प निधीअभावी अपूर्ण असून त्यासाठी तातडीने केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही पवारांनी केली. या जलसिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यास बऱ्याच प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेचा सल्ला
भुकेल्या आणि तहानलेल्या लोकांकडून तुम्ही ‘भारत माता की जय’ म्हणण्याची अपेक्षा कशी करू शकणार, असा सवाल करत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाडय़ात किमान एक दिवस तरी राहून दाखवावे, असे आव्हान
दिले.

महाराष्ट्रात उसाच्या शेतीला अधिक पाणी लागते, असा जावईशोध केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कोणत्या आधारावर लावला? उसाला जास्त पाणी लागते हे मान्य असले तरी राज्यातील सर्वच पाणीसाठी उसासाठी वापरला जात नाही. कृषिमंत्र्यांना काहीतरी गैरसमज झाला असावा.
– शरद पवार, माजी मंत्री

पिण्याच्या पाण्याची वानवा
अनेक राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची वानवा असल्याचे सांगत शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्य़ातील एका खेडय़ातील उदाहरण दिले. या खेडय़ात खूप दिवसांनी एकदाच पिण्याच्या पाण्याचा टँकर येतो व पुढील २५ दिवस ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागते, असे पवार म्हणाले. केंद्र व राज्यात मंत्री म्हणून काम करताना आपण अनेकदा दुष्काळाशी सामना केला. मात्र, यंदाची परिस्थिती अधिकच भीषण असल्याचेही पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 1:02 am

Web Title: sharad pawar slams central government over drought
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प पाच, तर क्लिंटन चार राज्यांत विजयी
2 लादेनला ठार मारण्याच्या अमेरिकी मोहिमेत पाकिस्तानला सौदी अरेबियाचा पाठिंबा
3 अरुंद मार्गिकेत पाण्याच्या रेणूच्या एकावेळी सहा सममिती अवस्था
Just Now!
X