News Flash

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मांडली भूमिका!

सचिन वाझे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात सध्या चर्चा आहे ती निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विरोधी पक्षाने टार्गेट केलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संपूर्ण प्रकणावर आपली भूमिका मांडली आहे. सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी गेल्यामुळे या मुद्द्यावरचं गूढ अधिकच वाढलं. आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील.” दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष टार्गेट करत असताना तो मुद्दा शरद पवारांनी फेटाळून लावला. “एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असं मला वाटत नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत”, असं ते म्हणाले.

परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार?

दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. “परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार की नाही, हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा”, असं ते म्हणाले. तसेच, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणात जबाबदारी पार पाडली आहे आणि जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांसमोर आणलं”, असं म्हणत त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द शरद पवारांनीच त्यांचं कौतुक केल्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता कमी झाली आहे.

“संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या घडामोडी, आज-उद्या अजून एका मंत्र्याचा राजीनामा”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर दावा!

काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पत्रकार परिषदेमध्येच पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांनी अपेक्षेप्रमाणेच सचिन वाझे, परमबीर सिंग आणि अनिल परब या मुद्द्यांवर पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 7:51 pm

Web Title: sharad pawar speaks on sachin vaze case parambir singh anil deshmukh pmw 88
Next Stories
1 लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
2 काँग्रेसमधून बाहेर पडलेले पी. सी. चाको आठवड्याभरात राष्ट्रवादीत दाखल!
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सल्लागार पी.के.सिन्हा यांचा राजीनामा
Just Now!
X