नितीशकुमारांच्या निर्णयाला राज्यसभा खासदार अलींचाही विरोध

महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांचा निर्णय त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या पचनी पडला नसल्याचे चित्र गुरुवारी होते. दुसरीकडे पक्षाचे राज्यसभा खासदार अन्वर अलींनी तर उघडपणे या निर्णयास विरोध केला. पक्षाच्या अकरा यादव व सात मुस्लीम आमदारांमधूनही विरोधाचे सूर बाहेर पडत असल्याची चर्चा आहे.

यादव यांनी सकाळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर सायंकाळी पाच वाजता स्वत:च्या विश्वासातील काही नेत्यांची बैठक बोलाविली. त्या बैठकीला आपली नाराजी उघड करणारे अन्वर अली, केरळमधून निवडून आलेले राज्यसभा खासदार वीरेंद्र कुमार उपस्थित होते. त्यात काय शिजल्याचे समजू शकले नाही. सध्या राज्यसभेत असलेले, वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले शरद यादव तसे संयुक्त जनता दलामध्ये कधीपासूनच एकटे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी नितीशांनी त्यांच्याकडून पक्षाध्यक्षपद काढून स्वत:कडे घेतले होते. जनादेशाचा आदर राखण्यासाठी किमान पाच वर्षे महाआघाडी टिकविण्याची त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी नितीशकुमारांना सांगितली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून भाजपबरोबर हातमिळवणी केल्याने शरद यादव नाराज झाल्याचे समजते. ते शपथविधीसाठी पाटण्याला तर गेले नाहीत, पण त्या वेळेच्या आसपास त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

दरम्यान, भाजपबरोबरील हातमिळवणीस असलेला विरोध राज्यसभा खासदार अलींनी लपविला नाही. ते म्हणाले, ‘‘आम्ही भाजपच्या जातीयवादाविरोधात महाआघाडी केली होती. पण जातीयवाद कमी झाला आहे का? किंबहुना भाजप दिवसेंदिवस अधिक आक्रमक होतोय. त्याला रोखण्याचे सोडून नितीशकुमारांनी भाजपशी हातमिळवणी करणे मला मान्य नाही. जसे नितीश यांनी स्वत:च्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला, तसा मीसुद्धा ऐकला असे सांगितले. त्यामुळे या निर्णयाविरोधात बोलतो आहे.’’ मात्र, पक्ष सोडण्याबाबत त्यांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले.

नरेंद्र मोदींचा मार्ग सुकर?

लोकसभेच्या पुढील निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. उत्तर भारत त्याचप्रमाणे पश्चिम आणि पूर्वेकडील भागांमध्ये भाजपने  हातपाय पसरल्याने २०१९ मध्ये भाजपचा मार्ग निर्वेध झाल्याचे मानले जात आहे. लोकसंख्येपैकी ७० टक्के जनतेवर आता भाजपची सत्ता आहे. देशातील मोठय़ा राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे, ज्या १२ राज्यांमधून २० किंवा त्याहून अधिक खासदार लोकसभेवर जातात त्यापैकी सात राज्यांमध्ये भाजपचे घटक पक्ष सत्तेवर आहेत.

आमदार कपिल पाटील यांची पंचाईत

मुंबई: दोनच महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत जनता दल (युनायटेड) पक्षात प्रवेश केलेले मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांची नितीशकुमार यांच्या भाजपबरोबरील घरोब्याने चांगलीच पंचाईत झाली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. समाजवादी चळवळीतील कपिल पाटील हे लागोपाठ दुसऱ्यांदा विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

केंद्रातही सामील..?

बिहारपाठोपाठ केंद्रातही सहभागी होण्याचा निर्णय नितीशकुमारांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यांना शिवसेनेप्रमाणे दोन मंत्रिपदे (एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद) देणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास सध्या नाराज असलेल्या शरद यादवांचे नाव सर्वात पुढे असेल. ११ ऑगस्टला अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल अपेक्षित आहे.

गोपाळकृष्ण गांधींचे काय?

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना अगोदरच पाठिंबा जाहीर करणारे नितीशकुमार आता बदलत्या परिस्थितीत काय करणार, याची उत्सुकता

लागली आहे. पाठिंबा कायम ठेवल्यास ‘एनडीए’ला पहिल्याच घासात विरोध केल्याचे चित्र होईल आणि विरोध केल्यास शब्द फिरविल्याचा आरोप होईल, अशा दुहेरी कात्रीत ते सापडले आहेत.