23 July 2019

News Flash

‘वसुंधरा राजे जाड झाल्यात, त्यांना आराम द्या’, वादग्रस्त वक्तव्यावर शरद यादव यांचं स्पष्टीकरण

शरद यादव यांनी आपण हे मस्करीत बोललो होतो, त्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असं म्हटलं आहे

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वसुंधरा राजे थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत असं वादग्रस्त वक्तव्य शरद यादव यांनी केलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना शरद यादव यांनी आपण हे मस्करीत बोललो होतो, त्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असं म्हटलं आहे.

‘वसुंधरा राजे आमच्या मध्य प्रदेशची कन्या आहेत. त्यांना आता विश्रांती द्या, त्या खूपच थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, यापूर्वी त्या चांगल्या बारीक होत्या’, असं वक्तव्य शरद यादव यांनी केलं होतं. अल्वर येथील मुंडावर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी ही टिपण्णी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली.

शरद यादव यांनी टीका होऊ लागल्यानंतर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी ते मस्करीत बोललो होतो. माझे त्यांच्याशी जुने संबंध आहेत. कोणत्याही दृष्टीने ते अपमानजनक नव्हतं. त्यांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जेव्हा मी त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनाही तुमचं वजन वाढलं असल्याचं सांगितलं होतं’, असं शरद यादव यांनी म्हटलं आहे.

शरद यादव यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यापूर्वी २४ जानेवारी २०१७ रोजी पाटणामधील एका प्रचार सभेत शरद यादव म्हणाले होते की, मताची इज्जत मुलीच्या इज्जतीपेक्षा मोठी असते. त्यांच्या या विधानावरुन टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्याला असे म्हणायचे नव्हते, तर मुलीवर जसे प्रेम करता तसे मतांवरही प्रेम करा, असे म्हणायचे होते अशी सारवासारव केली होती.

First Published on December 7, 2018 1:47 am

Web Title: sharad yadav explaination on derogatory remark on vasundhara raje