राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. शरद यादव यांनी हे विधान करुन फक्त मलाच दुखावलेले नाही तर त्यांनी सर्व महिलांचा अपमान केला आहे असे त्या म्हणाल्या. शरद यादव यांनी माझ्या बरोबरच प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे असे वसुंधरा राजे म्हणाल्या. वसुंधरा राजे राजस्थानच्या झालारपाटन विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

त्यांनी पावणेनऊच्या सुमारास मतदान केले. मतदानाच्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पुत्र आणि झालावारचे खासदार दुष्यत सिंह, त्यांची पत्नी निहारीका सिंह सोबत होते. मी कुठल्याही नेत्याबद्दल अशा प्रकारचे व्यक्तीगत विधान करत नाही. अशा प्रकारचे वागणे चांगले नव्हे. हे एक उदहारण आहे. पुढच्यावेळी निवडणूक आयोगाने अशा भाषेची दखल घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

‘वसुंधरा राजे आमच्या मध्य प्रदेशची कन्या आहेत. त्यांना आता विश्रांती द्या, त्या खूपच थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, यापूर्वी त्या चांगल्या बारीक होत्या’, असं वक्तव्य शरद यादव यांनी केलं होतं. अल्वर येथील मुंडावर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी ही टिपण्णी केली होती. त्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर शरद यादव यांनी आपण हे मस्करीत बोललो होतो, त्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असं म्हटलं आहे.