जदयूबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते शरद यादव हे नाराज असतील तर ते त्यांचा स्वतंत्र निर्णय घ्यायला मोकळे आहेत अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली आहे. नितीशकुमारांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला असून महाआघाडीपासून वेगळं होत चूक केली आहे असं वक्तव्य शरद यादव यांनी केलं होतं त्याला आता नितीशकुमारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी घेतला होता, शरद यादव यांना माझा निर्णय पटला नसेल तर त्यांनी खुशाल स्वतःचा मार्ग निवडावा त्यांना कोणीही थांबवणार नाही असंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये भाजपसोबत हातमिळवणी करत नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसले, त्याआधी लालूप्रसाद यादव यांच्या राजद या पक्षासोबत त्यांचा वाद सुरू होताच. या वादाच्या कालावधीदरम्यानच शरद यादव हे नितीशकुमारांवर नाराज होते अशा बातम्या येत होत्या, तसंच शरद यादव हे कदाचित काँग्रेसमध्येही जाऊ शकतात अशाही चर्चा रंगल्या होत्या, या चर्चांना पूर्णविराम देत शरद यादव यांनी आपण महाआघाडीसोबत आहोत असं म्हटलं होतं. तसंच नितीशकुमारांवर टीकाही केली होती. याच टीकेला नितीशकुमारांनी उत्तर दिलं आहे आणि शरद यादव यांना माझा निर्णय पटला नसेल तर त्यांनी त्यांची वेगळी वाट निवडावी असं त्यांनी म्हटलं आहे.

महाआघाडीतून बाहेर पडत नितीशकुमार यांनी राजदसोबत काडीमोड घेतला राजदसाठी हा निर्णय अत्यंत अनपेक्षित होता, त्यानंतर शरद यादव यांनीही वारंवार नितीशकुमारांवर टीकास्त्र सोडत त्यांना लक्ष्य केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नितीशकुमारांनी शरद यादव यांना थेट वेगळी वाट निवडण्यासाठी ते मोकळे आहेत असं प्रत्युत्तर देऊन टाकलं आहे. आता नितीशकुमारांच्या या प्रत्युत्तरानंतर शरद यादव वेगळा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.