जर भारतीय जनता पक्ष कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास विरोधकही आपला उमेदवार जाहीर करतील, असे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिले.
पुढील महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पदाचा कार्यकाळ संपत असल्याने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या पदासाठी शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
यादव म्हणाले, तीन वर्षांच्या केंद्र सरकारमध्ये लव्ह जिहाद, घरवापसी यासारखे विविध मुद्दे चर्चेला गेले होते. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार हा संविधानावर विश्वास ठेवणारा असल्यास त्याला विरोधक पाठिंबा देतील.
विरोधी पक्ष राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी चर्चा करत आहे. त्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकताच भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल या पक्षांसह इतर १७ पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप आपल्या घटक पक्षांशी यासंबंधी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत विरोधकांशीही चर्चा केली जाईल असे ते म्हणाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 8:14 pm