आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोपीय संघात ठेवण्यासाठी नवे बेलआऊट पॅकेज देण्याचा निर्णय युरोपीय संघाने घेतला. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. येथील भांडवली बाजारावर लगेच त्याचा परिणाम दिसून आला. सप्ताहारंभीच बाजाराने उसळी नोंदविल्याने मुंबई निर्देशांक २८ हजारांनजीक गेला. ग्रीसमधील आर्थिक अनिश्चितता संपुष्टात आल्याने भारतीय निर्यात तसेच बँक, विमा क्षेत्रानेही काहीसा नि:श्वास सोडला आहे. भारत-ग्रीस व्यापारात सिंहाचा वाटा राखणाऱ्या भारतीय पर्यटन व वाहन उद्योगावरील संभाव्य संकटही तूर्त दूर सारल्याची भावना उद्योग संघटना व्यासपीठावरून व्यक्त होत आहे.
गेल्या आठवडय़ाभरापासून ग्रीसबाबत असलेली अस्थिरता अखेर संपली. सोमवारी भांडवली बाजाराची सुरुवात होताच त्यात उसळी नोंदली गेली. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळीच सुरू झालेले आशियातील सर्व प्रमुख निर्देशांक वाढत होते. तर दिवसअखेरही ते ३ टक्क्यांपर्यंत उंचावले. युरोपातील बाजारातही हेच चित्र होते. तर मुंबई शेअर बाजार थेट २८ हजारांवर पोहोचला. त्यात शुक्रवारच्या तुलनेत ३०० हून अधिक अंश वाढ नोंदली गेली. दिवसअखेर सेन्सेक्सला २८ हजारांवर राहण्यात यश आले नसले तरी अनोख्या टप्प्यावर राहण्याची भूमिका राष्ट्रीय शेअर बाजाराने मात्र पार पाडली. निफ्टी शतकी वाढीने ८,५४० नजीक पोहोचला. मेमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दरामुळे व्याजदर कपातीची सोडलेली आशा पुन्हा या वातावरणाने जोर धरू लागली आहे.
सराफा बाजारातही सोमवारी मौल्यवान धातूंचे दर काहीसे स्वस्त झाले. सोने तर तोळ्यामागे २६ हजारांच्याही खाली उतरले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रथमच घसरले आहे. ग्रीसबरोबरच्या भारतीय वित्त तसेच वाहन, पर्यटन आदी व्यवहारांत येत्या कालावधीत पुन्हा एकदा वाढीचे चित्र दिसेल, अशी अपेक्षा भारतीय उद्योग संघटनांनी व्यक्त केली आहे.