भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी वाढीसह सुरुवात झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५७ हजारांचा पल्ला गाठला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबरपूर्वी सेन्सेक्स ६० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेन्सेक्ससोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी १७ हजारापर्यंत पोहोचला होता. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे.

अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील करोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीत याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले. तसेच ऑटो क्षेत्रातील विक्री आणि वाढता जीडीपी यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. आज टाटा स्टील, रिलायन्स, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, मारूती,ईजी ट्रिप प्लानर्स, एलअँडटी आणि एक्सिस बँकेच्या शेअर्सवर नजर असणार आहे. आज बीएसईवर लिस्टेड एएफ इन्टरप्राजेज, एजेल, धरानी शुगर्सस अँड केमिकल्स, इंडियन सूक्रोज, न्यूटाइम इन्फ्रा, ऑप्टो सर्किट्स, सूरतवाला बिझनेस ग्रुप, स्माईलडायरेक्ट क्लब आणि सिधु ट्रेड लिंक्स यांचे आर्थिक परिणाम येणार आहेत.

अमेरिकी लष्कराने सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

भारतीय शेअर बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी उत्साहाचं वातावरण दिसून आलं होतं. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने विक्रमी स्तर गाठला होता. बीएसई सेन्सेक्स २०५ अंकांच्या तेजीसह सुरु झाला. तेव्हा सेन्सेक्स ५६,३२९.२ होता. त्यानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३४ अंकासह ५६,९५८.२७ वर पोहोचला होता. शेवटी सेन्सेक्स ७६५.०४ अंकासह ५६,८८९.७६ अंकांवर बंद झाला. याचबरोबर निफ्टीही सोमवारी ७० अंकांच्या वाढीसह १,७७५.८५ वर सुरु झाला. बाजार बंद होता निफ्टी २२५.८५ अंकांसह १६,९३१.०५ वर बंद झाला होता. दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजार ३० ऑगस्टला १३६.३९ अंकांसह १५२६५.८९ वर बंद झाला होता. तर युरोपियन बाजारातही उत्साह दिसून आला. फ्रान्सच्या सीएसीत ०.०८ टक्के तर जर्मनीच्या डीएएक्समध्ये ०.२२ टक्क्यांची वाढ दिसून आली.