पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी दोनदा माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी केला आहे.

झरदारी (वय ६२) यांनी सांगितले, की ‘नवाज व शाहबाज यांनी मी भ्रष्टाचार प्रकरणात आठ वर्षांची शिक्षा भोगत असताना मला ठार मारण्याचा कट आखला होता. सुनावणीसाठी न्यायालयात जात असताना ठार मारण्याचे त्यांनी ठरवले होते.’

लाहोर येथे बिलावल हाऊसमध्ये पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी सांगितले, की ‘शरीफ बंधूंनी मिळून १९९०च्या सुमारास मला संपवण्याचा प्रयत्न केला. नवाज यांनी माझ्याशी संपर्क साधून पाठिंबा मागितला, पण मी तो दिला नव्हता.’ माझी पत्नी बेनझीर व माझ्याशी शरीफ बंधू कसे वागले हे मी विसरू शकत नाही. आम्ही त्यांना माफ केले व लोकशाही संहितेवर स्वाक्षरी केल्याचे ते म्हणाले.

मेमोगेट प्रकरण

लादेनवर छापा टाकल्यानंतर पाकिस्तानने देशातील सत्ता लष्कराच्या ताब्यात जाऊ नये यासाठी ओबामा प्रशासनाची मदत मागितली होती. त्या वेळी ते निवेदन पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत हुसेन हक्कानी यांनी झरदारी यांच्या वतीने तयार केले होते. शरीफ यांनी या मेमोगेट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली व झरदारी सरकार या प्रकरणी चौकशी करणार नसेल तर आपणच नॅशनल असेंब्लीचा राजीनामा देऊ, असा इशारा शरीफ बंधूंनी दिला होता. झरदारी म्हणाले, की ‘शरीफ बंधू हे विश्वासघातकी आहेत. त्यांच्याशी मी हस्तांदोलनही करणार नाही. ते नेहमी रंग बदलतात. ते अडचणीत असतात तेव्हा ते सहकार्यास तयार असतात, पण सत्तेवर आल्यानंतर ते तुमच्यावर प्रहार करण्यास मागेपुढे पाहात नाहीत, असा माझा अनुभव आहे.’ पुढील वर्षीच्या निवडणुकीत पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाशी युती करणार नाही, कारण आपला पक्ष भक्कम स्थितीत आहे असे ते म्हणाले.