पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज फेटाळला असून भारताबरोबरच्या काश्मीरसह इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात आम्हाला अमेरिकेने मदत करावी असे त्यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्या पूर्वसंध्येला त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांनी दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी रदबदली करावी. काश्मीर प्रश्नी अमेरिकेने हस्तक्षेप करावा ही त्यांची मागणी अमेरिका व भारत या दोन्ही देशांनी अनेकदा फेटाळली असूनही त्यांनी हा जुनाच राग आळवला.
यूएस इन्स्टिटय़ूट ऑफ पाकिस्तान या संस्थेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, काही वेळा आरोप केला जातो त्याप्रमाणे पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र नाही, त्याउलट पाकिस्तान हा दहशतवादाने पोळलेला देश आहे. दहशतवाद हेच पाकिस्तानसमोरचे खरे आव्हान आहे असे त्यांनी मान्य केले.
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिग यांनी गेल्या महिन्यात अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी पाकिस्तान हेच दहशतवादाचे केंद्र असल्याचा आरोप केला होता, त्याला अनुलक्षून शरीफ यांनी पाकिस्तान हा दहशतवादाचे केंद्रस्थान नाही असे विधान केले आहे.
काश्मीर प्रश्नी अमेरिकी हस्तक्षेपाची मागणी करताना शरीफ म्हणाले की, अमेरिकेचा भारतावर प्रभाव आहे त्यामुळे ते दोन्ही देशातील काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करू शकतात. अमेरिकेच्या सकारात्मक भूमिकेची पाकिस्तानला जाणीव आहे, अमेरिकेने अनेकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यास मदत केली आहे असे ते म्हणाले.
शरीफ यांनी गेल्या आठवडय़ातही काश्मीर प्रश्नाचे रडगाणे गायले होते पण जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्म भाग असून त्यावर कुठलीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही असे भारताने ठणकावले होते.