संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरबाबत केलेल्या ठरावाचे पालन न केल्याने भारताला सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व देऊ नये, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सांगितले.
ओबामा यांनी शुक्रवारी शरीफ यांना दूरध्वनी करून परस्पर हिताच्या मुद्दय़ांवर चर्चा केली व प्रादेशिक स्थिरतेवर अर्धा तास चर्चा केली.
या वेळी शरीफ यांनी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे सदस्यत्व देण्यास विरोध दर्शवला व काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचे पालन न केल्याने भारताला हे सदस्यत्व देऊ नये असे ओबामा यांना सांगितले.
ओबामा यांनी त्यांच्या दुसऱ्या भेटीत सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व भारताला देण्यास पाठिंबा दर्शवला होता. पाकिस्तानला अणुसाहित्य पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळावे अशी मागणी शरीफ यांनी ओबामा यांच्याकडे या वेळी केली. भारताला अणुसाहित्य पुरवठादार गटाचे सदस्यत्व देण्यास अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे ओबामा यांनी त्यांच्या भारतभेटीत सांगितले होते.
पाकिस्तानशी शांतता वाटाघाटी भारताने सुरू कराव्यात व त्यात काश्मीरसह सर्व प्रश्नांचा समावेश करावा, यासाठी अमेरिकेने दबाव आणावा अशी अपेक्षाही शरीफ यांनी व्यक्त केली. दहशतवादासह द्विपक्षीय प्रश्नांवर शरीफ व ओबामा यांनी मतांचे आदानप्रदान केले. उत्तर वझिरीस्तानात अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी झर्ब-ए-अज्ब ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल शरीफ यांचे ओबामांनी अभिनंदन केले. ओबामा व शरीफ यांनी सोयीच्या तारखेला नंतर भेटण्याचेही ठरवले आहे. भारतभेटीबाबत ओबामा यांनी शरीफ यांच्याशी चर्चा केली व भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यास अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ओबामा यांनी भारतभेटीच्या अगोदरही शरीफ यांना फोन केला होता व भेटीत काय घडले याबाबत त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले होते.