‘सीएए’विरोधात प्रक्षोभक भाषणामुळे देशद्रोहाचा गुन्हा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या शारजील इमाम याला पोलिसांनी मंगळवारी बिहारच्या जेहानाबाद येथून अटक केली. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शारजील फरार होता. त्याला जेहानाबादमधील काको या गावातून अटक करण्यात आल्याचे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले. शारजीलविरोधात उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीत गुन्हे दाखल आहेत. या राज्यांतील पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला मंगळवारी अटक केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी आर. के. राजक यांच्यापुढे हजर करण्यात आले. त्यांनी शारजीलला दिल्ली पोलिसांकडे सोपविण्याचे आदेश दिले.

‘जेएनयू’मध्ये पीएचडी करत असलेला शारजील हा आयआयटी, मुंबईचा माजी विद्यार्थी आहे. आसामसह ईशान्येचा भाग भारतापासून वेगळा करण्याबाबतचे भाष्य करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ‘आसामला भारतापासून तोडणे ही आमची जबाबदारी असून, त्यानंतर सरकार आपले ऐकेल’, असे इमाम म्हणाला होता.

त्याआधी शारजीलचा भाऊ मुजामिल याला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुजामिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शारजीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, शारजील स्वत: दिल्ली पोलिसांपुढे शरण आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान, नागरिकांना आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचविण्याची भाषा कोणी बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इमामच्या अटकेनंतर दिली.

‘शारजीलचे शब्द कन्हैयाच्या शब्दांपेक्षा धोकादायक’

जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारच्या शब्दांपेक्षा शारजीलचे शब्द धोकादायक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी म्हणाले. रायपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शहा यांनी शारजीलच्या अटकेचा उल्लेख केला. ‘‘तुम्ही शारजीलची चित्रफीत पाहिली का? कन्हैयाकुमारच्या शब्दांपेक्षा ती अधिक धोकादायक आहे. आसामला भारतापासून तोडण्याची भाषा शारजीलने केली. मात्र, त्याच्या सात पिढय़ांनाही ते शक्य होणार नाही,’’ असे शहा यांनी बजावले.