देशविरोधी वक्तव्यं करणाऱ्या शरजील इमामला करोनाची बाधा झाली आहे. त्याची COVID 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खरं तर त्याला २५ जुलै रोजी दिल्ली येथील कोर्टात हजर करायचं होतं. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्यासाठी अर्जही गुवाहाटी येथील मध्यवर्ती तुरुंगात केला होता. आता मात्र त्याला २५ जुलै रोजी दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार नाही. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

कोण आहे शरजील इमाम?

भारतापासून आसाम स्वतंत्र करा असं म्हणत देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील इमामला जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. बिहारमधील जहानाबाद या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी जहानाबाद या ठिकाणी शरजीलच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केलं. जानेवारी महिन्यातच ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली येथील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा तो माजी विद्यार्थी होता. त्याने चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसंच देशद्रोहाचा आरोपही त्याच्यावर आहे.