News Flash

मोदी यांचे निकटवर्तीय शर्मा उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी

शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटस्थ मानले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी या नेमणुकीची घोषणा केली.

लखनऊ : भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेने राज्य विधान परिषदेचे आमदार व माजी सनदी अधिकारी ए.के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटस्थ मानले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी या नेमणुकीची घोषणा केली. अधिकृत निवेदनाद्वारे सिंह यांनी लखनऊ येथील अर्चना मिश्रा व बुलंदशहरचे अमित वाल्मिकी यांची प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केल्याचेही जाहीर केले.

वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शर्मा यांनी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी ‘व्हायब्रंट गुजरात’ मोहीम यशस्वीरीत्या राबवून त्यांचा विश्वाास जिंकला होता. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पंतप्रधानांच्या योजनेनुसार काम करणाऱ्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालय या महत्त्वाच्या विभागाचे कामकाजही त्यांनी सांभाळले होते.

‘कुलभूषणप्रकरणी निर्णयाचा भारताकडून चुकीचा अर्थ’ 

इस्लामाबाद : भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा भारताने चुकीचा अर्थ लावल्याचा कांगावा शनिवारी पाकिस्तानने केला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बंधनांचे पालन करण्याची तयारी असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

जाधव प्रकरणाचा फेरआढावा घेण्यासाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जे विधेयक मांडण्यात आले त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलावी, असे गुरुवारी भारताने पाकिस्तानला सांगितले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानुसार फेरविचार करण्यासाठी यंत्रणा प्रस्तावित कायद्याने निर्माण होत नाही, असे भारताने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जी बंधने आहेत त्याची पूर्तता करण्यात आली आहे किंवा नाही, हे स्थानिक न्यायालये ठरवू शकत नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:01 am

Web Title: sharma uttar pradesh bjp vice president prime minister narendra modi akp 94
Next Stories
1 काँग्रेस, गांधी परिवार तुमच्या पाठीशी…!
2 काश्मीरमधील १४ नेत्यांना केंद्राचे  बैठकीसाठी आमंत्रण
3 ब्रिटनमध्ये तिसरी लाट; लसीकरणावर भर
Just Now!
X