पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यात बोलताना एक विधान केलं होतं. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातही मी सहभागी झालो होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली होती. मोदी बांगलादेशलाही फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत, असं थरूर म्हणाले होते. मात्र, टीका करताना चूक झाल्याचं लक्षात येताच थरूर यांनी प्रांजळपणे त्याची कबूल देत मोदींना सॉरी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजधानी ढाका येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. “बांगलादेशच्या लढ्यात मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मला अटक झाली होती आणि तुरुंगातही जावं लागलं होतं,” असं मोदी म्हणाले होते. मोदी यांच्या या विधानावरून शशी थरूर यांनी टीका केली होती.

“आंतरराष्ट्रीय शिक्षण : आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिलं,” अशी टीका थरूर यांनी केली होती.

टीका करताना चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर थरूर यांनी दुसरं ट्विट करत त्याची कबूली दिली आणि माफीही मागितली आहे. “माझी चूक असेल, तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे आणि ट्विट वाचून ट्विट केलं होतं. ‘बांगलादेशला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलंय हे सगळ्यांना माहिती आहे,’ असं मी म्हणालो होतो. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला… सॉरी,” असं थरूर यांनी दुसरं ट्विट करत म्हटलं आहे.

काय म्हणाले होते मोदी…?

“मी बांगलादेशातील बंधूभगिनी व येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं आंदोलन होतं. माझं वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.” असं मोदी म्हणाले होते.