पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशात एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होत असताना आता मोदींच्या कार्यशैलीवर आणि पद्धतीवर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी हल्ला चढवला आहे. एकटा माणूस देशातील सर्व प्रश्न सोडवू शकत नाही, असा जोरदार टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त सरकारची कामे, मिळालेल्या यशाचा लेखाजोखा मांडला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसने मोदी सरकारच्या अपयशाबाबत जनजागृती करण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी तिरुवअनंतपुरममध्ये पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर तोफ डागली. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासावर गंभीर परिणाम झाले आहेत, असे थरूर म्हणाले. आमच्या (काँग्रेस) पक्षाचे नेतृत्त्व इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. ते देशातील संस्कृतीला अनुसरून आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे नेतृत्त्व करत असून त्यांना पक्षाचे वरिष्ठ नेते मदत करतात. प्रत्येक समस्येवर सर्वांशी चर्चा केली जाते आणि त्यावर उपाय शोधला जातो. याउलट मोदी सरकारमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच निर्णयप्रक्रिया एकाच माणसाच्या हाती केंद्रित झाली आहे. त्यामुळं आजची वाईट परिस्थिती उद्भवली आहे, असेही थरुर म्हणाले. भाजपच्या नेतृत्त्वाखालील ‘एनडीए’ सरकार हे ‘एनपीए’ (Non Performing Asset) सरकार झाले आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

यावेळी थरुर यांनी मोदी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचला. प्रत्येक क्षेत्रात हे मोदी सरकार अपयशी ठरले आहे. ‘मेक इन इंडिया’ सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. पण अर्थमंत्री अरुण जेटली यावर काहीच बोलत नाहीत. याशिवाय त्यांनी विदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, असा सवालही थरुर यांनी केला. ‘हिंदू, हिंदी आणि हिंदुस्थान’ ही भाजपची संकल्पना आहे, पण ही देशाची नाही, असेही ते म्हणाले.