मोदी सरकारच्या प्रस्तावित तीन कृषी विधेयकांना विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तीन विधेयकांच्या विरोधात शुक्रवारी (२५ सप्टेबर) शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्याचबरोबर रेल्वे गाड्याही रोखून धरल्या होत्या. आंदोलनादरम्यान आंदोलकांना लाठ्यांनी मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट केला आहे.

शेतकऱ्यांनी शुक्रवारी केलेल्या भारत बंद आंदोलनाला देशभरात प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडल्या. एका घटनेचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट केला आहे. यात भाजपाचे कार्यकर्ते छोट्या टेम्पोत असलेल्या एका व्यक्तीला मारहाण करीत आहेत. हे कार्यकर्ते लाठ्या काठ्यांनी मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे.

हा व्हिडीओ ट्विट करतानाच शशी थरूर यांनी विजय ढिल्लो यांची कविताही पोस्ट केली आहे.

सौ बातों की एक बात है,
लम्बी, काली, गहन रात है
अगर अँधेरा हरना है तो
तूफानों में पलना होगा
स्वंय दीप बन जलना होगा
जब इक-इक मनुज चिल्लाएगा
तभी शोर मच पाएगा
लोकतंत्र जो रोगग्रस्त है
अब, सिर्फ तभी बच पाएगा
~ विजय ढिल्लों।
ही कविता पोस्ट करत शशी थरूरांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

शुक्रवारी करण्यात आलेल्या बंदमध्ये देशभरात शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. विशेषतः पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन करत रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर कडक बंदोबस्त करण्यात आला होता.