नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर-थरूर यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. थरूर यांना या प्रकरणी आरोपी म्हणून समन्स जारी करण्यात आले आहे.

दिल्लीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद कुमार यांच्यापुढे त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून, त्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा प्रतिसाद मागवला आहे. उद्या त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. थरूर यांना दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी केले असून, त्यांच्यावर पुष्कर यांचा क्रूरपणे छळ करणे व आत्महत्येस प्रवृत्त करणे हे आरोप आहेत.

वकील विकास पहवा यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात  थरूर यांनी म्हटले आहे, की अटक न करता आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्याचे म्हटले असल्याने जाबजबाबासाठी थरूर यांना अटक करण्याची गरज नाही. जर अटकेशिवाय आरोपपत्र दाखल झाले असेल तर जामीन अपरिहार्य आहे असे कायदा सांगतो, त्यामुळे थरूर यांना ७ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहता यावे यासाठी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा. आता या प्रकरणी उद्या सकाळी दहा वाजता सुनावणी होणार आहे.  ५ जूनला थरूर यांना आरोपी म्हणून सात जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स काढण्यात आले होते. थरूर यांच्या पत्नी सुनंदा यांचा १७ जानेवारी २०१४ च्या रात्री दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. थरूर यांच्यावर कलम ४९८ अ (पती किंवा नातेवाइकाकडून महिलेचा छळ), कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) ही कलमे लागू केली आहेत. थरूर हे तिरुअनंतपूरम मतदारसंघातील काँग्रेसचे लोकसभा खासदार आहेत.