काँग्रेस खासदार शशी थरूर हे आपल्या वकृत्त्वासाठी आणि लेखन कौशल्यासाठी सर्व जगभर ओळखले जातात. ब्रिटनमधील शाळांमध्ये ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि वसाहतवादाबद्दल का शिकवले जात नाही असा सवाल शशी थरुर यांनी विचारला आहे. त्यांचा हा प्रश्न ऐकून वृत्तवाहिनी चॅनेल ४ च्या निवेदकाची बोलती बंद झाली.  ब्रिटनने एक दोन वर्षे नव्हे तर भारतावर तब्बल २०० वर्षे राज्य केले. इतकेच नव्हे तर ज्यावेळी ते भारतामध्ये आले होते. तेव्हा भारत हा जगातील सर्वात समृद्ध देश होता. त्यानंतर त्यांनी भारतीयांचे शोषण केले. त्यामुळे ते जेव्हा देश सोडून ब्रिटनला परतले त्यावेळी भारत हा जगातील एक गरीब देश झाला. ब्रिटनला ऐतिहासिक स्मृतिभ्रंश आहे असे देखील ते म्हणाले. त्यामुळे तुमचा वसाहतवादाचा इतिहास इथे शिकवला जात नाही असे ते म्हणाले.

केवळ भारतावरच नव्हे तर अफ्रिका आणि आशियामधील अनेक देशांवर इंग्रजांनी राज्य करुन लूट केली. याबद्दल देखील इंग्लंडमध्ये काही बोलले जात नाही असे ते म्हणाले. शशी थरुर यांनी इनग्लोरियस एम्पायर हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाबद्दल बोलताना त्यांनी आपले विचार प्रकट केले.  शशी थरुर यांनी लंडनमध्ये असे बोलण्याची ही काही पहिली वेळ नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना भाषण करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी ब्रिटिशांना सुनावले होते. ब्रिटिशांनी भारतासोबत जे काही केले आहे त्याची क्षमा मागण्याची ही वेळ आहे असे ते म्हणाले होते. इतकेच नव्हे तर भारताकडून जी लूट त्यांनी नेली होती. ती देखील व्याजासकट परत करावी असे थरुर यांनी म्हटले होते. शशी थरुर यांनी केलेल्या युक्तीवादामुळे तेथील सर्व लोक थक्क झाले होते. भारत आणि इंग्लंडमध्ये असलेल्या या इतिहासामुळे दोन्ही देशातील संबंधांवर परिणाम होत आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. सध्या परिस्थिती बदलली आहे असे त्यांनी म्हटले. दोन्ही देशांचे आर्थिक संबंध आता चांगले आहेत असे ते म्हणाले.