काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत एक महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला आहे. एक धार्मिक स्थळ पाडून त्याजागी राम मंदिर उभारावे असे चांगल्या हिंदूंना वाटत नसल्याचे थरुर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. ‘द हिंदू लिटरेचर फॉर लाइफ’ फेस्टिवल आणि व्याख्यानमालेत ते रविवारी थरुर बोलत होते.

थरुर म्हणाले, समस्त हिंदू समाजाला वाटते तसे एक हिंदू म्हणून मलाही यापूर्वी राम मंदिर बाबरी मशीदीच्या जागीच व्हावे असे वाटायचे. अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, असा मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा विश्वास आहे. मात्र, चांगल्या हिंदूंना दुसऱ्याचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करुन त्याजागी राम मंदिर नको आहे. राम मंदिर वादावर थरुर यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे या क्षणी यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

थरुर म्हणाले, आगामी निवडणुकीच्या काळात लोकांना मोठ्या प्रमाणावर धार्मिक विद्वेषाच्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. आगामी काळात निवडणुका, धार्मिक मुद्दे आणि सांप्रदायिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुढील काळात काही अप्रिय घटनांचा समाना करावा लागू नये याची मला काळजी वाटते, असेही ते यावेळी म्हणाले. रामजन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी ज्या हिंदू संघटनांनी कमिटीची स्थापना केली आहे, त्या संघटनांवर थरुर यांनी यावेळी टीका केली. त्याचबरोबर गो रक्षणाच्या नावाखाली सुरु असलेल्या मॉब लिंचिंगवरुन थरुर यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाने देशाची वाट लावल्याचे सांगत मोदी सरकारने केलेली नोटाबंदीही अपयशी ठरल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, थरुर यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्यावर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कडवट प्रतिक्रिया दिली असून थरुर हे नीच माणूस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तीवर हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल आहे. त्या व्यक्तीबाबत काय बोलायचं असं स्वामी यांनी थरुर यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे.