काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान होण्याच्या व्यक्त केलेल्या महत्त्वाकांक्षेची खिल्ली उडवल्याबाबत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा अहेर दिला असून विरोधी पक्षनेत्याने पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही, असे म्हटले आहे.

मोदी यांनी विरोधी पक्षाला पीपीपी म्हणजे पंजाब, पुडुचेरी व परिवार असे बिरूद लावून फारच किरकोळ व मामुली स्तर गाठला आहे, अशी टीका करून सिन्हा म्हणाले की, मोदी यांनी विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका अयोग्य होती. आपण देशातील १३० कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलतो याचे भान त्यांनी ठेवायला पाहिजे होते. पीपीपी या आद्याक्षरांच्या आधारे कोटी करणे म्हणजे शिशुवर्गात लघुरूपे शिकवतात की काय असे वाटणारे होते. देश म्हणजे शाळा नव्हे. अशा कोटय़ा करणे तुमच्या मनातील भीती दाखवते. पंतप्रधानांकडून लोकांना परिपक्वतेचे दर्शन घडवणारेभाषण हवे असते. त्यांच्या  बोलण्यातून ते दिसले नाही.

राहुल गांधी लोकांना आवडतात. तुम्ही स्वप्ने पाहता तर त्यांनी ती का पाहू नयेत. मोदी सरकारला ललित मोदी, नीरव मोदी, पंजाब नॅशनल बँक, रफाल विमाने खरेदी यात अवघड प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत. उलट राहुल गांधी यांनी काही अचूक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना उत्तरे देण्याऐवजी तुम्ही लोकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकारण करीत आहात, अशी टीका त्यांनी केली.