भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘एक वकील आर्थिक प्रकरणांवर बोलू शकतो, एक टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री होते आणि एक चहावाला पंतप्रधान बनू शकतात तर मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही पण त्यांचा इशारा मोदी, जेटली आणि इराणी यांच्याकडे होता. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. लोकांमध्ये जीएसटी आणि नोटाबंदीवरून राग आहे. गुजरात विधानसभा निवडणूक भाजपसाठी निवडणूक नसून एक ‘आव्हान’ आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी माझ्या पक्षाला आव्हान देत नसून फक्त भाजपला राष्ट्रीय हितासाठी ‘आरसा’ दाखवत असल्याचे त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. ते म्हणाले, जीएसटी, नोटाबंदी, बेरोजगारीवरून लोकांमध्ये राग पाहता भाजपला किती जागा मिळतील हे मी सांगू शकत नाही. पण ही निवडणूक भाजपसाठी एक आव्हान असणार आहे. भाजप एकजूट राहिल्यास त्यांच्या जागा वाढू शकतात. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांना ते दुसऱ्या राजकीय पक्षात जाणार का असा प्रश्न विचारताच त्यांना ‘खामोश’ या आपल्या चिरपरिचित शैलीत उत्तर दिले.

सरकारला देश चालवण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या विरोधी पक्षातील तज्ज्ञ आणि ज्ञानी लोकांकडून सूचना मागितल्या पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिली. अरूण जेटली यांनी यशवंत सिन्हांवर केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. ८० वर्षीय यशवंत सिन्हा यांनी ‘नोकरीसाठीचे अर्जदार’ अशा शब्दांत टीका केली होती. यावर सिन्हा यांनी जेटलींना टोला लगावला. जेटली स्वत: आपली नोकरी गमावण्याची शक्यता आहे आणि हे दुसऱ्यांसाठी नोकरी सुचवायला निघाले आहेत, असे ते म्हणाले.