भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी त्यांच्यावरील पक्ष कारवाईच्या सर्व शक्यता फेटाळून लावताना आपल्यावर कारवाई झाल्यास त्याची प्रतिक्रिया उमटेल, असा अप्रत्यक्ष इशाराही भाजपला दिला आहे. प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया असते, या त्यांच्या ट्विटरवरील विधानामुळे राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याशिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील जवळीक वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांचे नाव एका महाविद्यालयाला देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजपकडून कारवाई होणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, या सगळ्या बातम्या निराधार असून काहीजणांकडून वैयक्तिक स्वार्थासाठी या गोष्टी पसरविल्या जात असल्याचे सिन्हा यांनी ट्विटरवर सांगितले आहे. मी अशा बातम्यांवर प्रतिक्रियाही व्यक्त करू इच्छित नाही. मात्र, प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते, हा न्यूटनचा सिद्धांत सगळ्यांनी लक्षात ठेवावा, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न केल्यामुळे आमच्याच गोटात गोंधळ निर्माण झाल्याचेही त्यांनी ट्विटसच्या मालिकेत म्हटले आहे. याशिवाय, सिन्हा यांनी लोक जनशक्ती पक्षाचे राम विलास पासवान यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली आहे.

यापूर्वी लोकसभेतून कॉंग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर सिन्हा यांच्याकडून भाजपला घरचा आहेर मिळाला होता. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या आणि २५ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याबद्दल दुःख वाटते आहे. निलंबित करण्यात आलेला एक खासदार तर सभागृहातही नव्हता, अशा आशयाचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले होते.