पाटणासाहिब मतदारसंघातून रविशंकर यांच्याविरोधात उमेदवारी

भाजपनेतृत्वावर सातत्याने टीका करून मोदी-शहा यांचा अधिकाधिक रोष ओढवून घेणारे अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही तासांतच काँग्रेसने पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारीही घोषित केली. बिहारमधील हा मतदारसंघ शत्रुघ्न सिन्हांचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.

मी २५ वर्षे भाजपमध्ये काढलेली आहेत. माझा पक्ष सोडण्याचा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. भाजपच्या स्थापनादिनी मी अत्यंत दु:खी मनाने माझ्या जुन्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे, अशी मनोभावना शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी काँग्रेस मुख्यालयात पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सहा महिने शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. ते सातत्याने विरोधी पक्षांच्या सभांमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत. गेल्या आठवडय़ात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला होता.

वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री राहिलेले शत्रुघ्न सिन्हा यांना मोदी सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने ते कमालीचे नाराज झाले होते. पक्षाविरोधात त्यांनी थेट कुठलीही कृती केली नाही. मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावेळीही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, विविध व्यासपीठांवर त्यांनी गेली पाच वर्षे मोदी-शहा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली होती.

काँग्रेसप्रवेशामुळे आता भाजपमधून काढून टाकण्याच्या धमक्या येणार नाहीत, अशी तिरकस प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. भारतरत्न नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या राजकीय गुरूंचे मार्गदर्शन मिळत गेले. भाजपने राजकीय शिक्षण घडवले. या पक्षाबद्दल माझ्या मनात कोणतीही वाईट भावना नाही, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

वन मॅन शो : केंद्र सरकार म्हणजे वन मॅन शो आणि सध्याचा भाजप म्हणजे टू मॅन आर्मी अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी आणि शहांची निर्भर्त्सना केली. मंत्रिमंडळाला काही किंमत नाही. सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात. अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवले गेले. यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यासारख्या नेत्यांनाही पक्षात स्थान राहिले नाही, अशी खंत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली.