दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील(डीडीसीए) कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि भाजप खासदार किर्ती आझाद यांच्यात सुरू असलेल्या वादात आता खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली आहे. सिन्हा यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून अरूण जेटलींना अंगावर घेणाऱ्या आझाद यांना ‘हिरो’ची उपमा दिली. त्याचवेळी जेटलींविरोधात आवाज उठवणाऱ्या आझाद यांच्याविरोधात भाजपने कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंतीही शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला केली आहे. यावेळी सिन्हा यांनी पुन्हा एकदा न्युटनच्या तिसऱ्या नियमाचा दाखला देताना अयोग्य वेळी केलेल्या गोष्टी आपल्यावर उलटू शकतात असे सांगितले. दुर्देवाने सध्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेला पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ झाला आहे. अर्थमंत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी हा मुद्दा कायदेशीर नव्हे तर राजकीय पद्धतीने लढवावा. आपल्या धडाडीच्या पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी अडवाणींचा मार्ग अनुसरावा जेणेकरून ते या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडतील, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.