स्वपक्षाला वरचेवर घरचा आहेर देणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात उडी घेतली. आपल्या बिहारचा सुपूत्र आणि ‘जेएनयूएसयू’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असणाऱ्या कन्हैय्याच्या भाषणाची प्रत मी वाचली आहे. त्याने कोणतेही देशद्रोही किंवा संविधानविरोधी वक्तव्य केलेले नाही, असे सिन्हा यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे. त्यामुळे तो लवकरच सुटेल अशी आशा आहे. तो जितक्या लवकर सुटेल तितके बरे होईल, असेही सिन्हा यांनी म्हटले. दरम्यान, आज कन्हैय्या कुमारची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, त्याला दिल्ली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र, कन्हैय्या कुमार याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने पीटीआयला दिल्याचे वृत्त आहे.