नेहमी पक्षाविरोधात विधानं करणं बॉलिवूड अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना चांगलंच महागात पडणार आहे. बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष नित्यानंद साई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी तिकीट देणार नसल्याच सांगितलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी यु-टर्न घेतला तरी तिकीट देणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र भाजपाने माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे (सेक्युलर) प्रमुख जितन राम मांझी यांना एनडीएत पुन्हा सहभागी होण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत.

यावेळी नित्यानंद साई यांना पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणा मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी नरेंद्र मोदींनी भुमीपूजन केल्याबद्दल कौतुक केलं असल्याचं सांगितलं. यावर त्यांनी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दिली.

एरव्ही पक्षाविरोधात विधान करत बंडखोरी करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी यु-टर्न घेतला आहे असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘जर लोक असा विचार करत असतील की, पक्ष सोडून जायचं आणि परत आल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल तर ते चुकीचा विचार करत आहेत. भाजपा आपल्या धोरणांच्या आधारे तसंच उमदेवारांची पक्षाप्रती आणि देशाप्रती असलेल्या कटिबद्धतेच्या आधारे तिकीट वाटप करते’.

नित्यानंद साई यांनी यावेळी जितन राम मांझी पुन्हा एनडीएत सामील होण्यास इच्छुक असतील तर स्वागत आहे असं सांगितलं. ‘सध्या यावर कोणतीही चर्चा सुरु नसून गरज पडल्यास नक्की चर्चा करु. मी नेहमीच त्यांचं स्वागत आहे असं सांगितलं असून भाजपा पक्ष त्यांचा आदर करतं. जेव्हा ते एनडीएबाहेर होते तेव्हाही त्यांचा तितकाच आदर करत होतो’, असं त्यांनी सांगितलं.