पक्षात असूनही नेहमी पक्षाविरोधात भूमिका घेत टीका करणारे भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा बिहारमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र शत्रुघ्न सिन्हा ही निवडणूक भाजपाच्या नाही तर विरोधी पक्ष काँग्रेसच्या तिकीटावर लढू शकतात. याआधी बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष नित्यानंद साई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट देणार नसल्याच सांगितलं होतं.

शत्रुघ्न सिन्हा नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करतात. मात्र पक्षाविरोधात बंडखोरी करणं यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना महागात पडू शकतं. शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा पक्षविरोधी वक्तव्य करुनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पण यावेळी लोकसभेत उमेदवारी डावलत त्यांच्यावर अप्रत्यक्ष कारवाई केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शत्रुघ्न सिन्हा 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत पाटणा साहिब मतदारसंघातून निवडून आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मात्र भाजपा त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आपल्याला उमेदवारी डावलली जात असल्याची माहिती मिळताच शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण काहीही झालं तरी निवडणूक लढणार आहे…मग दुसऱ्या पक्षात जावं लागललं तरी चालेल असं म्हटलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यात ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या रॅलीतही शत्रुघ्न सिन्हा सहभागी झाले होते. ‘जरी मी भाजपाचा भाग असलो तरी मी देश आणि लोकांसाठी पहिलं बोलणार. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सर्व लक्ष लोकशाहीवर होतं पण मोदींच्या कार्यकाळात हुकूमशाही सुरु आहे’, अशी टीका त्यांनी केली होती.