बंगळुरूमधली ४७ वर्षीय महिला आपली आई आणि भावाच्या मृतदेहासोबत २ दिवस राहत असल्याची घटना समोर आली आहे. आपल्या घरमालकाच्या घरातून कसलातरी विचित्र वास येत असल्याने भाडेकरुंना शंका आली आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजराजेश्वरी नगर भागात ही घटना घडली आहे. आर्यंबा(६५) आणि त्यांचा मुलगा हरिश(४५) अशी मृतांची नावे असल्याचं समजत आहे. हरिशला करोनाची लागण झाली होती. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. मात्र, आर्यंबा यांच्या मृत्युमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
त्यांच्या घरात राहणारा भाडेकरु प्रवीण यांना पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृत हरिश याचा मृतदेह झिजत चालला होता. अधिकाऱ्यांना घराच्या खिडकीजवळ हा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांना खोलीतून एक महिला बाहेर येताना दिसली. ती थकलेली दिसत होती. तिच्या आईचाही झिजत चाललेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. या परिवाराच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही एकत्र राहत होते आणि त्या ४७ वर्षीय महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं होतं.

पोलिसांना शंका आहे की तिची आई आणि भाऊ या दोघांचाही मृत्यू २ दिवसांपूर्वी झालेला आहे. ही महिला दोन दिवस या मृतदेहांसोबत राहत होती. या महिलेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हरिशने २५ एप्रिल रोजी रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केल्याचं आणि ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं पोलिसांना तपासातून कळालं आहे. पोलिसांनी सांगितलं की, या दोघांचाही मृत्यू करोनानेच झाल्याचं प्राथमिक तपासातून कळत आहे. मात्र या दोघांच्याही वैद्यकीय तपासणीनंतर मृत्युचं खरं कारण समोर येईल.

दक्षिण बंगळुरूमधल्या राजराजेश्वरी नगर पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यू म्हणून याची नोंद कऱण्यात आली आहे.