शीना व मिखाईल आपलीच मुले असून इंद्राणीसोबत आपण लग्नाशिवाय (लिव्ह इन) राहत होतो, असा धक्कादायक खुलासा सिद्धार्थ दास याने केला आहे. तसेच इंद्राणी पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे सांगत शीनाच्या मृत्यूमागे तीच असल्याकडे दासने बोट केले आहे.
शीना बोरा खूनप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी मिखाईलने शीनाचा सख्खा भाऊ असल्याचा दावा केला होता. मात्र शीनाच्या आजीने व काकाने याबाबत शीना इंद्राणीची मुलगी असल्याचे सांगत मिखाईलबाबत काही माहिती नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढत चालली होती.
या सर्व नाटय़ाच्या आठवडाभरानंतर शीना व मिखाईल यांचा खरा पिता प्रसारमाध्यमांसमोर आला आहे. त्याने ही दोन्ही अपत्ये आपल्यापासून इंद्राणीला झाल्याची कबुली दिली आहे. मात्र इंद्राणीशी लग्न न करताच एकत्र राहत असल्याचा खुलासा त्याने केला. तसेच या प्रकरणामुळे आपली बदनामी होऊन नोकरी जाण्याची भीती दासने व्यक्त केली. शीनाची जन्मतारीखही दासच्या लक्षात असून फेब्रुवारी, १९८७ मध्ये शीनाचा व त्यानंतर सप्टेंबर, १९८८ मध्ये मिखाईलचा जन्म झाल्याचे दासने सांगितले. मात्र १९८९ मध्ये इंद्राणी कोणतेही कारण न सांगता सोडून गेली. कदाचित तिला आपले काम आवडत नसावे. शीना दहावीमध्ये शिकत असताना शेवटचे तिच्याशी बोलल्याचे दास म्हणाला.दरम्यान, इंद्राणी व दास यांच्या नातेसंबंधांबाबत कल्पना नव्हती. मात्र आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे दासच्या पत्नीने सांगितले.
बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरु   
अलिबाग – शिना बोरा हत्याप्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पेण पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुदेश मिरगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण आणि पोलीस पाटील गणेश ढेणे यांची मंगळवारी पोलीस अधिक्षक कार्यालयात दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. गागोदे येथील जंगलात २०१२ मध्ये स्थानिकांना एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक सुदेश मिरगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक धांडे यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला त्यावेळी भेट दिली होती. पंचनामा करून मृतदेहाच्या हाड, मास आणि केसाचे नमुने मुंबई जे जे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. मात्र प्रथमदर्शनी हा खून असल्याचे स्पष्ट होत असूनही, या घटनेची आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली नाही, तसेच कोणताही गुन्हा दाखल केला नाही.