काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावरच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेते शहजाद पूनावाला यांनी मात्र या सगळ्या प्रक्रियेवर टीका केली आहे. त्यामुळे शहजाद पूनावाला हे नाव चर्चेत आहे. ‘मी शहजाद आहे शहजादा नाही’ अशी टीका करत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसमध्ये घराणेशाहीच्या जोरावरच राष्ट्रीय अध्यक्षपद मिळते अशीही टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान केला होता. तशाच काहीशा भावना आजच्या घडीला माझ्याही मनात आहेत असेही शहजाद यांनी म्हटले आहे. मी जेव्हा घराणेशाहीविरोधात आवाज उठवला तेव्हा माझा अपमान करण्यात आला. मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी असेही म्हटले नव्हते. मात्र या निवडणूक प्रक्रियेत काहीतरी घोटाळा होतो आहे हे मी लक्षात आणून दिले. असे असूनही माझे कोणीही ऐकून घेतले नाही असा आरोप पूनावाला यांनी केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.

रविवारी सकाळीच मी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मी फोन केला. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मी सांगितले की सोमवारी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत गडबड होते आहे त्याचे पुरावेही तुम्हाला देऊ शकतो. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अपमान करत माझा फोन ठेवून दिला. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेस कार्यालयातून माझ्याशी संपर्क साधण्यात आला होता मात्र आता ते म्हणत आहेत की मी काँग्रेसचा सदस्यच नाही.

काँग्रेसमध्ये घराणेशाहीच आहे. ती नसती तर मीदेखील अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकलो असतो.  ‘गांधी’ या आडनावाच्या ऐवजी जर पात्रता हा निकष ग्राह्य धरण्यात आला असता तर खूप चांगले झाले असते. काँग्रेस पक्षात असे अनेक लायक उमेदवार आहेत ज्यांच्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळण्याची क्षमता आहे. राहुल गांधी हे आडनावामुळे नाही तर त्यांच्यातील राजकीय क्षमतेमुळे अध्यक्ष झाले असते तर जास्त समाधान वाटले असते असेही पूनावाला यांनी म्हटले आहे.

कोण आहेत शहजाद पूनावाला?

शहजाद पूनावाला हे प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा मेहुणा तेहसीन पूनावालाचे भाऊ आहेत. अनेकदा शहदाज पूनावाला विविध टीव्ही चॅनल्सवर काँग्रेसची बाजू मांडताना दिसतात. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत ते विविध कार्यक्रमांमध्ये हजेरीही लावतात. रॉबर्ट वाड्रा यांच्या बहिणीचे लग्न शहजाद यांचा भाऊ तेहसीन पूनावाला यांच्यासोबत झाले आहे.