बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरध्वनीवर अभिनंदन केले व त्यांना बांगलादेशात येण्याचे निमंत्रण दिले, दोन्ही देशातील संबंध सौहार्दपूर्ण राहतील व द्विपक्षीय प्रश्नावर चर्चा सुरू राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
  पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्तयाने सांगितले की, शेख हसीना यांनी मोदी यांना दूरध्वनी करून सरकार व बांगलादेशच्या जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी मोदी यांना बांगलादेश भेटीचे निमंत्रणही दिले व दोन्ही देशातील संबंध चांगले राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली, असे हसीना यांचे खास सहायक महबुलबुल हक शकील यांनी सांगितले.
शेख हसीना यांनी नंतर लगेचच मोदी यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे पत्रही पाठवले आहे. बांगलादेशचा मित्र असलेला नेता भारताचे नेतृत्व करणार आहे याचा आनंदच आहे असे त्यांनी सांगितले.
असे असले तरी भारतात मोदींचे सरकार आल्याने द्विपक्षीय संबंधात फार मोठे बदल होण्याची अपेक्षा नाही. अवामी लीगचे काँग्रेसशी ऐतिहासिक संबंध होते.
अवामी लीगचे सचिव व स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री सय्यद अशरफ उल इस्लाम यांनी सांगितले की, ज्यांना भारतात भाजपची सत्ता आल्याने आनंद झाला आहे त्यांना भाजपच्या परराष्ट्र धोरणाची माहिती नाही.