बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोधी पक्षांशी चर्चेला सपशेल नकार दिला आहे. निष्पापांची हत्या करणाऱ्या खुनी लोकांशी आपण चर्चा करणार नाही, असे हसीना यांनी म्हटले आहे. बांगलादेशात अलीकडेच झालेल्या राजकीय हिंसाचाराच्या उद्रेकात १००हून अधिक जण ठार झाले आहेत.
चर्चा, कोणाशी, ज्यांनी लोकांना जाळून मारले त्या खुन्यांशी, असे सवाल करून हसीना यांनी चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले. बस आणि ट्रकवर करण्यात आलेल्या पेट्रोलबॉम्बच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ६२ जणांवर ढाका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून हसीना यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्या वार्ताहरांशी बोलत होत्या.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या खलिदा झिया यांच्या समर्थकांनी घडविलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १००हून अधिक जण ठार झाले आहेत. या हिंसाचारात २४ बंडखोरही ठार झाले असले तरी ते सुरक्षा रक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पेट्रोलबॉम्बचा वापर करून निष्पापांना जाळून मारण्यात आले असल्याचे दृश्य वेदना देणारे आहे, जनता इतक्या अमानवी थराला जाऊ शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धारही या वेळी हसीना यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शेख हसीना यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे बांगलादेशातील घडामोडींकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.