अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर देश सोडून पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या हजारो अफगाणी नागरिकांत हजारा वंशाच्या अनेक शिया मुस्लिमांचा समावेश आहे. ते क्वेट्टातील हजारा शहरात आले असून त्यांच्या सुटकेच्या कहाण्या थरारक आहेत.

सुटका करून घेतलेल्या अशाच एका कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे. मानवी तस्करी करणाऱ्या दलालांना हजारो रुपये मोजल्यानंतर हे कुटुंब पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पोहोचू शकले. त्यांनी स्पिन बोल्दाक आणि चमन सीमा मार्गाने प्रवास केला. या कुटुंबाचे प्रमुख डॉ. खालीद हजारा यांनी दूरध्वनीवरून आपली ‘आपबिती’ ऐकवली. ते एक सरकारी डॉक्टर असून त्यांची पत्नीही काबूलमध्ये सरकारी नोकरी करीत होती.

२००१ मध्ये तालिबानचा पाडाव झाला होता, तेव्हापासून हे दोघे काबूलमध्ये काम करीत होते. त्यांच्या मुलींसोबत कुटुंबाचा गाडा आनंदात सुरू होता. या वेळी मात्र तालिबानने ज्या सहजपणे आणि अचानक काबूलचा ताबा घेतला, त्याची आम्ही कधी कल्पनाच केली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

अफगाणी निर्वासितांनी प्रामुख्याने कराचीत आश्रय घेतला असून तेथे सुमारे सहा लाख निर्वासित आहेत. त्याखालोखाल हजारा शहरात हजारा वंशाच्या निर्वासितांनी आसरा घेतला आहे. सुन्नी मुस्लीम असलेल्या तालिबानकडून धोका जाणवत असल्याने हजारा कुटुंबे या शहरात आली आहेत. त्यापैकी अनेक जण गेली वीस वर्षे काबूलमध्ये सरकारी सेवेत होते. अफगाणिस्तानचा राजा अब्दुर रहमान याने छळ केल्यानंतर १८८० पासूनच हजारा कुटुंबांनी क्वेट्टा शहरात स्थलांतर केले होते.