11 December 2017

News Flash

अयोध्येतील ‘त्या’ जागेवर राम मंदिर बांधा- शिया वक्फ बोर्ड

वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 8, 2017 4:17 PM

संग्रहित छायाचित्र

वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, असे शिया वक्फ बोर्डाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याशिवाय राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असेदेखील या प्रतिज्ञापत्रात शिया वक्फ बोर्डाने म्हटले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता आहे.

शिया वक्फ बोर्डाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावे, असे म्हटले आहे. या मंदिरापासून विशिष्ट अंतरावर मशीद उभारली जावी, असेदेखील बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ‘बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत बातचीत करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे,’ असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

‘राम मंदिर आणि बाबरी मशिदीची उभारणी झाल्यास अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात येईल. यासोबतच मंदिर आणि मशिदीच्या उभारणीमुळे दररोज यावरुन सुरु असलेले वाददेखील संपुष्टात येतील. यामुळे वारंवार अशांतता निर्माण करणारे प्रसंग उद्भवणार नाहीत,’ असेदेखील शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सांगितले. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती ११ ऑगस्टपासून याचिकांवरील सुनावणीला सुरुवात करणार आहे.

First Published on August 8, 2017 3:38 pm

Web Title: shia waqf board files affidavit in supreme court in babri masjid and ram mandir issue