दिल्लीमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दुर्घटनेनंतर येथील रस्त्यांवर नागरिकांकडून झालेला निषेध आणि निघालेले मोर्चे हे जनमानसाचे प्रतिबिंब होते. मात्र ज्या संवेदनशून्यतेने दिल्ली पोलिसांनी हे मोर्चे हाताळले, त्यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास गमावला, अशा शब्दांत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्ली पोलिसांवर टीका केली.
सीएन्एन् आयबीएन् वाहिनीवरील करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘त्या’ दुर्घटनेनंतर आठवडाभराने राष्ट्राला उद्देशून भाषण केले, मात्र हे थोडे लवकर झाले असते तर अधिक उत्तम झाले असते, अशी भावनाही शीला दीक्षित यांनी व्यक्त केली.
आज लोकांना पोलीस दलास मदत करण्याची भीती वाटते. संकटात सापडलेल्या व्यक्तीस मदत करणे म्हणजे पोलिसांकडून होणाऱ्या ‘छळा’स आमंत्रण अशीच जणू सामान्य माणसांची भावना होत चालली आहे, हे लक्षात घेऊन पोलिसांनी आपली कार्यपद्धती बदलावयास हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पोलीस दलाची कार्यपद्धती फारशी समाधानकारक नाही, न्यायव्यवस्था आणि नोकरशाही यंत्रणासुद्धा यातही आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे आणि यासाठी योग्य तो कालावधी पण देणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जनतेचा झालेला उद्रेक हा सयुक्तिक होता असे सांगत राजकारणी, नोकरशहा, पोलीस आणि सरकारच्या प्रत्येकच घटकासमोर असा उद्रेक हाताळणे हे एक आव्हान असते, असे मुख्यमंत्री दीक्षित म्हणाल्या.