शिमला येथील सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी सीबीआयने पोलीस महानिरीक्षकांसह आठ जणांना अटक केली आहे.

शिमलात जुलैमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ माजली होती. या घटनेनंतर आठवडाभर शिमलात तणाव होता. या प्रकरणातील एका आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणात शिमलातील दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक झहूर एच झैदी यांच्यासह पोलीस उपअधीक्षक मनोज जोशी आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना सीबीआयने मंगळवारी अटक केली. कोटखईचे पोलीस निरीक्षक राजिंदर सिंह, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपचंद शर्मा, हेड कॉन्स्टेबल सूरत सिंह, मोहन लाल, रफिक अली आणि रणजीत सिंह यांचाही यात समावेश आहे.

 

कोटखईमध्ये ४ जुलैरोजी १० वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित मुलीची हत्या केली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह जंगलात मिळाला होता. हे प्रकरण समोर येताच कोटखई परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी सहा नराधमांना अटक केली होती. यातील राजेंद्र उर्फ राजू या आरोपीचा सूरज या नेपाळी व्यक्तीसोबत वाद झाला होता. वाद झाल्यानंतर राजूने सूरजला भिंती आपटले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सूरजचा मृत्यू झाला. सूरजने पोलिसांना दिलेल्या जबाबात मुख्य आरोपी म्हणून पिक अप गाडीचा चालक राजूचे नाव घेतले होते. यातूनच सूरजची हत्या झाली होती. हे तिघे एकाच कोठडीत होते. या घटनेनंतर कोटखई पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती.