हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील मॉलरोडवरील ६५ वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट मंगळवारी बंद झाले. ९ जुलै रोजी या रेस्टॉरंटचे शटर खाली पडले ते कायमसाठीच. शिमल्यातील सर्वात जुन्हा रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट तेथे मिळणारा गुलाबजामसाठी खूप लोकप्रिय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही येथील गुलाबजाम खूप आवडायचे. मोदी ज्यावेळी हिमालच प्रदेश भाजपाचे प्रभारी होते त्यावेळी ते या रेस्टॉरंटमध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून यायचे. नुकताच त्यांनी नमो अॅपवरुन एका ब्लॉगमध्ये या रेस्टॉरंटचा आणि तेथे मिळणाऱ्या चविष्ठ गुलाबजामचा उल्लेख केला होता. मोदींबरोबरच इतरही अनेक दिग्गज येथे मिळणाऱ्या गुलाबजामचे चाहते होते.

सर्वोच्च न्यालायलाने १५ जुलै रोजी या रेस्टॉरंटच्या मालकाला जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे. ही जागा खाली करुन लवकरात लवकर ती खऱ्या मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायलायाने या रेस्टॉरंटच्या मालकाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायलयामध्ये या रेस्टॉरंटसंबंधीत खटला सुरु होता. हा खटला नंतर उच्च न्यायलयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात आला. जागेचा मालक हा रेस्टॉरंट मालकाकडून अधिक भाड्याची मागणी करत असल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला होता. बाजार भावानुसार शिमल्यामधील या जागेचे भाडे दर महिन्याला दीड लाख रुपये इतके आहे. मात्र जागेचे मालक रेस्टॉरंट मालकाकडून २५ लाख रुपयांची मागणी करत होता. यावरुनच हा वाद न्यायलयात गेला आणि न्यायालयाने हा वाद मिटवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १० जुलै हा रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्यासाठी न्यायालयाकडून देण्यात आलेला शेवटचा दिवस होता. म्हणूनच ९ जुलै रोजी या रेस्टॉरंटचे शटर कायमसाठी बंद झाले.

१९५४ साली चंद्र बालाजी यांनी हे रेस्टॉरंट सुरु केले होते. १९९६ साली त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी रेणू बालाजी या रेस्टॉरंटचा कारभार पाहत होत्या. अखेर स्थापनेनंतर आता ६५ वर्षांनंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. शिमल्यातील प्रसिद्ध मॉल रोडवर फिरुन आल्यानंतर स्थानिकांबरोबर पर्यटकही येथील गुलाबजाम आणि पेस्ट्रीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून थांबायचे.

शिमल्यातील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट बंद होत असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी शेवटच्या दिवशी येथे येऊन गुलाबजामचा आस्वाद घेतला. या रेस्टॉरंटमधील अनेकजण मागील ३५ ते ४० वर्षांपासून येथे काम करत होते. उदाहरणच घ्यायचे झाले तर भगत राम हे १९८५ पासून येथे काम करत होते. त्यांचे बालपण आणि तारुण्य या रेस्टॉरंटमध्ये काम करतच गेले. आता हे रेस्टॉरंट बंद झाल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन राहिले नाही. भगत राम यांची मुलेही लहान असल्याने त्यांच्या घरातील एकमेव उत्पानाचा स्त्रोत बंद झाल्याने त्यांच्यासमोर घर चालवण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आमच्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची अशीच स्थिती असून आता आम्ही काय करावे हे समजत नसल्याचे भगत राम यांनी सांगितले आहे. येथे काम करणारे अनेकजण हे ५० किंवा त्याहून अधिक वयाचे असल्याने त्यांना आता पुन्हा नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. या रेस्टॉरंटमध्ये ७० कर्मचारी होते. हे सर्वजण आता बेरोजगार झाले असून रेस्टॉरंट बंद होण्याबद्दल आपल्याला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच न्यायलयाच्या आदेशानंतर हॉटेलच्या मालकांनी आमचा उर्वरित पगारही दिला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोण कोण होते येथील गुलाबजामचे चहाते

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई, बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांच्याबरोबर नेते मंडळींमध्ये हिमाचल प्रदेशचे विरिष्ठ नेते वीरभद्र सिंह, शांता कुमार, प्रेम कुमार धुमळ आणि जयराम ठाकूर यांना येथील गुलाबजाम विशेष आवडायचे.