राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये हिंदूू दहशतवादाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या स्फोटक विधानाला काँग्रेसश्रेष्ठींचे पाठबळ लाभले आहे. मात्र, संघ आणि भाजपने सोमवारी शिंदेंवर ‘ते दहशतवाद्यांचे लाडके’ बनले आहेत, अशा शब्दांत आगपाखड केली.
शिंदे यांच्या विधानाच्या निषेधासाठी भाजपने येत्या गुरुवारी रस्त्यावर उतरून देशव्यापी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. शिंदे यांनी भगव्या दहशतवादाचे आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी, अशी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. संघ आणि भाजपवर हिंदूू दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करून शिंदे सीमेपलिकडील दहशतवादी संघटनांचे लाडके बनल्याची तिखट प्रतिक्रिया संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी व्यक्त केली. शिंदे यांच्या विधानावर संघ-भाजप आक्रमक झाले असले तरी आतापर्यंत शिंदे किंवा अन्य कोणत्याही जबाबदार काँग्रेस नेत्याने त्याविषयी खेद व्यक्त केलेला नाही.
*शिंदेंची शेरेबाजी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पथ्यावर
 लाहोर : केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना नवे बळ मिळाल्याचे सोमवारी दिसून आले. भारतातील  दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असतो, या नेहमीच्या आरोपातील फोलपणा शिंदे यांच्या या विधानामुळे सिद्ध झाला आहे, अशी मखलाशी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हफिज सईद याने येथे केली.

काँग्रेसचा डाव  जयपूरचे चिंतन शिबिर तसेच काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या राहुल गांधींना लक्ष्य करू पाहणाऱ्या भाजपसोबत संघावरही शिंदे यांच्या हिंदू दहशतवादाच्या विधानामुळे स्वतचा बचाव करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस चिंतन शिबिराचे फलित आणि काँग्रेसमधील राहुल गांधींच्या उदयावरून भाजपने सुरू केलेली टीका बंद झाली आहे. शिंदे यांनी हे विधान हेतुपुरस्सर केले असून त्यांना काँग्रेसश्रेष्ठींचे छुपे समर्थन असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.