‘पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुका उधळून लावण्याचे नक्षलवाद्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मंगळवारी झालेल्या नक्षली हल्ल्याचा आम्ही बदला घेऊ’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी नक्षलवाद्यांची निर्भर्त्सना केली. दरम्यान, या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असतानाच नक्षलवाद्यांनी मंगळवारी बस्तर विभागात केलेल्या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. या घटनेनंतर शिंदे यांनी बुधवारी छत्तीसगढला धाव घेतली. शहिदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर शिंदे यांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुका उधळून टाकण्यासाठीच नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. मात्र, त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांना अधिकाधिक कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करावी लागणार असल्याच्या मुद्दय़ाकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले. गेल्या वर्षी राज्यात झालेली विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली होती. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करायची असून सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही ढिलाई केली जाऊ नये, असे आदेशही गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी नक्षली हल्ल्याचा बदला घेण्याचे सूतोवाच केले. बदला कसा घेणार असे विचारले असता ते म्हणाले की, ‘गेल्या वर्षी केंद्रीय व राज्याच्या राखीव पोलीस दलांनी एकत्रितपणे मोहीम राबवून नक्षलवाद्यांची कोंडी केली होती. त्यांचे अनेक नेतेही पकडले गेले. त्यामुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी घाबरून आक्रमकपणा घेतला आहे. मात्र, त्यांना योग्य वेळी ठेचण्यात येईल.’
गुप्तचरांचे अपयश?
नक्षलवाद्यांचा हल्ला होणार, असा इशारा छत्तीसगढ सरकारला देण्यात आला होता. मात्र, हा हल्ला कुठे व कधी होणार याची नेमकीोहिती हाती लागत नव्हती. त्यामुळे ठोस कारवाई करता आली नाही, असे शिंदे म्हणाले. नक्षलवाद्यांची चळवळ आता क्षीण होत चालल्याने त्यात प्राण फुंकण्यासाठीच हे भ्याड हल्ले केले जात असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी केला.
शिंदे यांच्या वक्तव्याचे काँग्रेसकडून समर्थन
नक्षलवाद्यांनी मंगळवारी केलेल्या कृत्याचा सूड घेण्यात येईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याप्रकरणी काँग्रेसने त्यांचे समर्थन केले असून त्यांनी काहीही चूक म्हटलेले नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारशी हातमिळवणी करून जे भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देत आहेत, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सरकार सक्षम आहे. त्यांचा शक्य तितक्या लवकर नि:पात करण्यात येईल आणि यापुढेही त्यांच्याविरोधात तशीच कारवाई करून अशा विघातक शक्तींना लोकशाही मूल्यांसमोर मान वर करून बघता येणार नाही, असे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करीत असून या हल्ल्यात मरण पावलेल्यांना आम्ही सलाम करतो, असेही ते म्हणाले.

१२ हजार बळी
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ओदिशा, छत्तीसगढ, झारखंड, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांत नक्षलवाद फोफावला आहे. गेल्या दोन दशकांपासून या चळवळीने अधिकाधिक हिंस्र रूप धारण केले असून त्यात आतापर्यंत १२ हजार जणांना प्राण गमवावा लागला आहे.